जागेमधील फेरबदल, व्याजावर व्याज आकारणी आणि चुकीच्या फ्लॅट क्र.ची नोंदणी. : ऍड. रोहित एरंडे
आमच्या सोसायटीमधील नवीन सभासदाने त्याच्या तळमजल्यावरच्या फ्लॅटमध्ये नूतनीकरण चालू केले. अर्ज देताना संपूर्ण घरातील नूतनीकरणाबरोबर न्हाणीघरातील व संडासमधील बदल करण्याचे सूतोवाच केले होते. प्रत्यक्षात घरातील बदल सुचवणाऱ्या वास्तूतज्ज्ञांच्या (वास्तुविशारद नव्हे) सल्ल्यानुसार काही बदल केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे संडास व न्हाणीघर पूर्ण मोकळे केले असून त्याठिकाणी मुलासाठी खोली बनवली आहे. घर २बीएचके आहे. मास्टरबेडरूमला संडास व न्हाणीघर आहे. परंतु मधली जी खोली आहे त्या खोलीत न्हाणीघर व संडास नव्याने आहे जिथे मागील बाजूस पाण्याची व ड्रेनेजची लाईन मुळातच नाही (वास्तूविशारदाच्या आराखड्यानुसार) बनवलेले न्हाणीघर व संडास यासाठी मागील बाजूस स्वतःच्या खर्चाने ड्रेनेज लाइन टाकून ती मुख्य लाइनला जोडणार आहे. नवीन खिडकी बनवणे, मास्टरबेडरूमला मागील बाजूस पूर्वीच्या सभासदाने जो दरवाजा बनवला तो तसाच ठेवून आणखी एक सेफ्टी डोअर बनवणे जो सोसायटीच्या जागेत आहे, घरात आलेल्या विद्युत केबलऐवजी दुसरीकडूनच केबल घेणे, जिन्याच्या भागातील जागेचा नूतनीकरणासाठी वापर करणे, एखादा सभासदाने असे करणे हे कायद्याला धरून आहे का?
राजन बुटाला , डोंबिवली
उत्तर : जागेची दुरुस्ती करणे आणि जागेत फेरबदल करणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण नमूद केलेले बदल हे दुरुस्ती मध्ये मोडणारे नसून फेरबदल किंवा जादा बांधकाम ह्या सदरात मोडतात. उपविधी क्र. ४६ अन्वये सदनिकेच्या जादा फेरबदलासाठी सोसायटीची पूर्व परवानगी असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे असे फेरबदल हे मंजूर बांधकाम नकाशाच्या विपरीत आणि इमारतीला धोका पोहोचतील असे आणि सोसायटीच्या जागेवर अतिक्रमण करणारे अश्या स्वरूपाचे कायद्याने असू शकत नाहीत. ह्या करिता आपल्याला किंबहुना सोसायटीला सक्षम कोर्टामध्ये संबंधित सभासदाविरुद्ध दाद मागता येईल तसेच महानगरपालिकेमध्ये देखील मंजूर नकाशाविरुद्ध जागेमध्ये फेरबदल केले म्हणून तक्रार करता येईल. वीज कनेशन हे स्वतःच्या मीटरमधूनच घेणे गरजेचे आहे. नूतनीकरणासाठी जिन्यातील जागेचा तात्पुरता वापर केल्यास ती जागा स्वच्छ ठेवणे आणि त्यामुळे इतरांना त्रास होणार नाही ह्याची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
..
प्रश्न ६जाने.२
मी बांद्रे येथील एका हाउसिंग सोसायटीचा सभासद आहे. याच सोसायटीत माझा भाऊ व बहीणदेखील राहतात. ते दोघे सोसायटीचा देखभाल खर्च देऊ शकत नाहीत. या थकित देखभाल खर्चाच्या मूळ रकमेवर तसेच त्यावरील व्याजावर आता सोसायटीने व्याज लावले आहे. असे करणे सोसायटीच्या कार्यकारिणीच्या व कायद्च्या कक्षेत येते का? यातून मार्ग कसा काढावा.
संदीप शेणॉय
उत्तर : सोसायटीचा मेंटेनन्स देणे हे प्रत्येक सभासदाचे कर्तव्य आहे. त्यात कसूर झाल्यास अशा थकबाकीवर उपविधी क्र. ७१ अन्वये, २१% किंवा जनरल बॉडी ठरवेल त्या पैकी जो कमी असेल त्या दराने 'सरळ' व्याज घेता येते, मात्र इंटरेस्ट ऍक्ट, १९७८ अन्वये व्याजावर व्याज आकारता येत नाही. सबब सोसायटी कार्यकारिणीशी बोलून जादा व्याज वजा करून बाकिची कायदेशीर थकबाकी देऊन टाकावी.
प्रश्न ६जाने.३
आमच्या नाशिक येथील कार्तिकेय गृहनिर्माण संस्थेत 25 नंबर प्लट वरील व्यक्तीचे नाव 5 नंबर प्लट वर नगरपालिकेत लागून गेले आहे तरी पंचवीस नंबर वाला म्हणतो मला पाच नंबर द्या पाच नंबर वाल्या जवळ रजिस्टर खरेदीखत आहे तर मग यातून कसा मार्ग निघेल.
एक वाचक
उत्तर : सर्व प्रथम हे लक्षात घ्यावे कि ७/१२ उतारा, प्रॉपर्टी कार्ड , नगरपालिकेतले टॅक्स रेकॉर्ड ह्यांच्यावर मालकी हक्क ठरत नाही. त्यामुळे खरेदीखतात ज्या फ्लॅटचा नंबर नमूद केला असेल तोच फ्लॅट त्या व्यक्तीच्या मालकीचा होईल. केवळ नगरपालिकेमधील रेकॉर्डमध्ये फ्लॅट नंबरची अदलाबदल झाली म्हणून मूळ मालकी बदलत नाही. तरी नगरपालिकेच्या रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करून घेणे इष्ट राहील.
प्रश्न : आमच्या सोसायटीमध्ये ६ नंबर फ्लॅट वरील सभासदाचे नाव ३ नंबर फ्लॅटवर महानगरपालिकेत लावले गेले आहे. आता ६ नंबरचा सभासद म्हणतोय कि मला ३ नंबरचा फ्लॅट द्या आणि माझा ६ नुंबरच तुम्ही घ्या. दोघांकडे रजिस्टर करारनामे आहेत. तर काय करावे ?
एक वाचक, अकोला
उत्तर : सर्व प्रथम जागेमध्ये मालकी हक्क कश्याने मिळतो हे लक्षात घ्यावे. ७/१२ उतारा, प्रॉपर्टी कार्ड , नगरपालिकेतले टॅक्स रेकॉर्ड ह्यांच्यावर मालकी हक्क ठरत नाही, तर रजिस्टर करार केल्यानंतर तयार होणारा इन्डेक्स-२ हा मालकी हक्काचा पुरावा म्हणून कायद्याने ओळखला जातो . त्यामुळे करारनाम्यामध्ये ज्या फ्लॅटचा नंबर नमूद केला असेल तोच फ्लॅट त्या व्यक्तीच्या मालकीचा होईल. केवळ नगरपालिकेमधील रेकॉर्डमध्ये फ्लॅट नंबरची अदलाबदल झाली म्हणून मूळ मालकी बदलणार नाही. त्यामुळे सदरील दोन्ही सभासदांना महानगरपालिकेच्या अलाहिदा अर्ज करून रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करून घेणे इष्ट राहील.
ऍड. रोहित एरंडे
ऍड. रोहित एरंडे
सोसायटी मेंटेनन्स ही स्क्वेअर फुट प्रमाणे करावी अथवा सर्वांना एक समान मेंटेनन्स करण्यात यावी. आमची संगमनेर शहरातील कांचन कम्फर्ट्स नावाची को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी आहे. इथे वन बीएचके व टू बीएचके फ्लॅट आहेत ज्यांना वेगवेगळ मेंटेनन्स आकारला जातो हे कितपत योग्य आहे. ऑपरेटिंग हाऊसिंग सोसायटीमध्ये क्षेत्रफळानुसार मेंटेनन्स लावण याची तरतूद आहे का
ReplyDeleteनमस्कार सर, आमच्या सोसायटी कमिटीची नॉमिनेशन प्रोसेस सुरू असताना conviction संदर्भात एक मुद्दा समोर आला आहे. सोसायटीतील सभासदांना bye law ११९. अ अंतर्गत - सर्व नॉमिनेटेड व्यक्तिंनी त्यांचे कॅरेकटर सर्टिफिकेट जमा करावे, असे बंधनकारक करण्यात येत आहे. कोणतेही ठोस कारण लिखीत स्वरूपात न देता अथवा काही ठोस आक्षेपनसताना असे कॅरेकटर सर्टिफिकेट अथवा पोलीस व्हेरिफिकेशन जस्ट आऊट ऑफ curiocity बंधनकारक करणे योग्य आहे का ? कायद्याला धरून आहे का ? भावी चेअरमन ही पोलीस व्हेरिफिकेशन प्रोसेस करण्यासाठी खाजगी एजन्सी मार्फत करून घेण्यासाठी आग्रह करीत आहे, जे कि व्यक्तिगत रित्या सहज करता येऊ शकते.
ReplyDeleteमाझ्या अभ्यासाच्या मते, कोणत्याही व्यक्तिला ठोस कारणाशिवाय अथवा ठोस ऑब्जेक्शन असल्याशिवाय असे कॅरेकटर सर्टिफिकेट अथवा पोलीस व्हेरिफिकेशन मागण्याची अनुमती नाही. जे मानव अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे. येथे सेल्फ ऍफिडेव्हिट देऊन सुद्धा bye law ११९. अ अंतर्गत असलेली व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करण्यात येऊ शकते.
याबाबत मार्गदर्शन करावे